बांगलादेश - ढाका शहरातील 'होली आर्टिसन बेकरी'मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी बांगलादेशच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने ७ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१६ साली शहरातील गुलशन भागात एका प्रसिद्ध बेकरीमध्ये 5 बंदुकधारी व्यक्तींने हल्ला केला होता. यामध्ये १७ परदेशी नागरिकांसह २० जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात तारिशी जैन या भारतीय तरुणीचाही मृत्यू झाला होता. तिला आज न्याय मिळाला आहे.
या हल्ल्याप्रकरणी न्यायलयाने एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. कडेकोट बंदोबस्तात आज(बुधवारी) न्यायालयाने निर्णय दिला. १ जुलै २०१६ रोजी ढाका शहरातील गजबजलेल्या गुलशन भागातील होली आर्टिसन बेकरीत ५ बंदुकधारी व्यक्तीने हल्ला चढवला होता. हल्ल्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नसला तरी या प्रकरणी हात असलेल्या ७ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, यामुळे आम्ही निर्णयाचे स्वागत करतो, असे सरकारी वकील गोलाम शारुर खान झाकीर या व्यक्तीने सांगितले. दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायमुर्ती मुजिबुर रेहमान यांनी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
मागील वर्षी जुलै महिन्यात दहशथवादी विरोधी पथक आणि ढाका पोलिसांनी ८ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. हे सर्वजण बंदी घालण्यात आलेल्या जमातुल मुजाहिदीन बांगलादेश या संघटनेचे सदस्य होते. यातील ७ जणांना न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. विवादीत धर्मगुरु झाकीर नाईक यांच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन दहशतवादी कृत्य केल्याचे आरोपींनी मान्य केले होते.
या हल्ल्यात भारतीय तरुणी तारिशी जैनचाही झाला होता मृत्यू
होली आर्टिसन बेकरी हल्ल्यात भारतातील एका तरुणीचाही मृत्यू झाला होता. मुळची दिल्ली जवळील गुरुग्राम येथील तारिशी जैन या १९ वर्षीय तरुणी या हल्ल्यात मरण पावली. तारिशी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेत होती. विद्यापिठातील एका प्रकल्पासाठी ती बांग्लादेशात आली होती.
आर्टिसन बेकरी हॉटेलात मित्र मैत्रिणींबरोबर जेवन करत असताना अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने हल्ला चढवला. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत तारिशी आणि तिच्या मैत्रीणी वॉशरुममध्ये लपून बसल्या. मात्र, हल्लेखोराने आतमध्ये लपलेल्या सर्वांना ठार मारले. तिने मदतीसाठी आपल्या नातेवाईकांनादेखील फोन केला होता. तारिशीचा गळा चिरुन खुन करण्यात आला होता.