नवी दिल्ली- जगभरामध्ये काल (शुक्रवार) कोरोनाच्या संसर्गामुळे १ हजार ६२७ जणांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये काल एका दिवसात तब्बल ७९३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात झालेल्या बळींचा हा उच्चांक होता. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ४,८२५ बळी गेले असून, चीनमध्ये एकूण ३,२५५ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, बरे होणाऱ्यांची संख्या ९५ हजारांच्या पुढे आहे.
जगभरामध्ये कोरोनामुळे १३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. स्पेन, जर्मनी, अमेरिका आणि फ्रान्समध्ये कोरोनाच्या रुग्णांची आणि बळींची संख्या वाढतच आहे. काल दिवसभरात स्पेन, जर्मनी, अमेरिका आणि फ्रान्समध्ये अनुक्रमे २८८, १६, ४६, ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरामध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे. भारतामध्ये आतापर्यंत ३४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ हजारांहून अधिक नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.