बीजींग -कोरोना विषाणूच्या बळींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. चीनमध्ये या विषाणूच्या बळींनी शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १०६ जणांनी या विषाणूमुळे आपला प्राण गमावला आहे. तर सोमवारी या विषाणुचा संसर्ग झालेले आणखी १,३०० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जवळपास चार हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे समजत आहे.
या विषाणूमुळे जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चीनने जवळपास एक डझनहून अधिक शहरांमधील वाहतूक बंद केली आहे. तसेच नागरिकांनाही देशाबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जवळपास ६० दशलक्ष लोकांच्या दैनंदिन जीवनावर यामुळे परिणाम झाला आहे. तर, चीनमधील नववर्षासाठीच्या सुट्ट्यांचा कालावधी वाढवून, शाळा-विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.