बीजिंग - कोरोना विषाणू संसर्गाने चीनमध्ये थैमान घातले आहे. येथे मृतांची संख्या तब्बल ८१० झाली आहे. २००३ मध्ये सार्सच्या संसर्गामुळे गेलेल्या बळींचा आकडाही आता कोरोनाने मागे टाकला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सार्समुळे ९ महिन्यांमध्ये ७७४ बळी गेले होते. हा आजार तब्बल २६ देशांमध्ये पसरला होता.
चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत २ हजार ६४९ लोकांना या संसर्गापासून वाचवण्यात यश आले आहे आणि त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगीही मिळाली आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे न्युमोनिया झालेल्या ३३ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
याआधी, हुबेईतील स्थानिक आरोग्य आयोगाने या प्रांतात ७८० जण कोरोनाची लागण झाल्याने दगावल्याचे जाहीर केले होते. तर, १ हजार ४०० जणांना यातून वाचवण्यात यश आल्याचे त्यांनी म्हटले होते.
सध्या चीनमध्ये प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले असून विशेषतः कोरोना बाधित प्रांतांना इतर प्रांतांपासून अलग ठेवण्यात आले आहे. यामुळे ५६ दशलक्ष लोक प्रभावित झाले आहेत. या विषाणूचा संसर्ग आणखी वेगाने पसरण्याची भीती लोकांमध्ये आहे.
चीनच्या वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे डिसेंबरमध्ये सर्वात प्रथम निदर्शनास आले होते. तेव्हापासून आतापर्यंत हा आजार तब्बल २५ देशांमध्ये पसरला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.