बीजिंग - कोरोना विषाणूच्या संसर्गाने चीनमध्ये थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये या विषाणूमुळे ८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, २,३०० हून अधिक नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. देशातील परिस्थिती पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून चीनच्या एक डझनहून अधिक शहरांमधील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनाही बाहेर पडण्यापासून मज्जाव केला जातो आहे. तब्बल ५६ दशलक्ष लोकांच्या दैनंदिन जीवनावर यामुळे परिणाम झाला आहे.
चीनबाहेर कोरोना..
अनेक देशांनी विमानतळांवर तपासणी यंत्रे आणि पथके तैनात केली आहेत. विशेषतः चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांना विशेष सुरक्षेमध्ये ठेवण्यात येत आहे. केवळ चीनच नाही, तर आतापर्यंत थायलंड (7), नेपाळ (1), व्हिएतनाम (2), सिंगापूर (4), जपान (3), दक्षिण कोरिया (3), व्हिएतनाम (२), अमेरिका (3), फ्रान्स (३) आणि ऑस्ट्रेलिया (४) या देशांमध्येही कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत.
भारत आणि कोरोना..
रविवारपर्यंत भारतात एकूण १३७ विमानांतून आलेल्या २९,७०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही, असी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर, केरळ आणि महाराष्ट्रात एकूण १०० संशयित रुग्णांना निरिक्षणाखाली ठेवले आहे.
नेपाळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे भारताने नेपाळ सीमेवरील जिल्ह्यांमध्ये आरोग्य पथकांना तैनात केले आहे. उत्तराखंडच्या काही जिल्ह्यांमध्येही दक्षता घेण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विशेष आरोग्य पथकांना नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोचीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याचे निर्देश दिले आहेत. याठिकाणी येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे.
चीनची तयारी..
या विषाणूला लढा देण्यासाठी चीनने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांसाठी विशेष रुग्णालय उभारण्याचे काम चीनमध्ये सुरू आहे. तसेच, नवीन असलेल्या या आजारावर लस शोधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. आधीच एखादा आजार असणाऱ्या रुग्णांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.
हेही वाचा : कोरोना विषाणू : राजस्थान सरकारकडून राज्यात अलर्ट जारी