बीजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा ७१९ वर पोहोचला आहे. तर, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ३४ हजारवर पोहोचला आहे. दोन दशकांपूर्वी सार्स आजारामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा कोरोना विषाणूने पार केला आहे.
कोरोना विषाणू चीनमध्ये पसरण्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. तसेच ज्या पद्धतीने चीन आरोग्य आणिबाणी हाताळत आहे, त्यावरूनही नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. चीनबाहेर कोराना विषाणू संसर्गामुळे दोन बळी गेले आहेत. त्यातील एक बळी हाँककाँगमध्ये आणि दुसरा फिलिपाईन्समध्ये गेला आहे. तसेच २५ देशांमध्ये कोरोना पसरल्याची भीत व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
जगभर या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या या आजारवर कोणताही खात्रीशीर इलाज नाही. काही ठिकाणी एचआयव्ही आणि इतर विषाणूजन्य आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.
आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना यावर संपर्क साधता येणार आहे. भारतीय दुतावास हुबेई प्रांतातील नागरिकांना मदत करतच आहे. काही गरज पडल्यास चिनी प्रशासनातील विविध विभागांचे नंबर आणि ईमेल शेअर करत असल्याचे ट्विट परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. या संपर्कामध्ये चिनी विद्यापीठांचेही नंबर देण्यात आले आहेत.
अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यास आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेशसह अनेक देशांनी हुबेई प्रांतामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.
चीनमध्ये कोरोनाचे ७१९ बळी; आरोग्य आणिबाणी हाताळताना चीनची दमछाक - कोरोना व्हायरस बातमी
कोरोना व्हायसर चीनमध्ये पसरण्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. तसेच ज्या पद्धतीने चीन आरोग्य आणिबाणी हाताळत आहे, त्यावरून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
कसा पसरला कोरोना विषाणू ?
पँगोलीयन म्हणजेच खवले मांजर हा प्राणी कोरोना विषाणू माणसात पसरण्यास जबाबदार असावा, या अनुषंगाने चिनी शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. कोरोना विषाणू वटवाघळू पक्षापासून आला असावा याबाबतही संशोधन सुरू आहे. मात्र, वटवाघळामधून सरळ माणसांमध्ये कोरोना विषाणू पसरला नसून तो पँगोलीनद्वारे आला असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
पँगोलीयन प्राण्याची मोठ्या प्रमाणात तस्करीही करण्यात येते. चीन आणि व्हिएतनाममध्ये या प्राण्यांचे मास सेवन केले जाते. तसेच वैद्यकीय दृष्ट्याही पँगोलीयनला महत्त्व आहे.