कोलंबो -श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ 'किंग्सबरी' हॉटेलमधील सीसीटीव्हीचा आहे. यामध्ये संशयीत एका खोलीत बॉम्ब ठेवताना स्पष्टपणे दिसतोय. २१ एप्रिलला इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेमध्ये एकामागून एक ८ बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये जवळपास ३५० लोकांचा मृत्यू झाला होता. तर, ५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
नुकताच समोर आलेल्या व्हिडीओत संशयीत हॉटेलच्या आवारात लाल कारमधून येताना दिसतो. तेथे तो गाडी पार्क करून हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर जातो आणि आपल्या रुमच्या किल्ल्या घेतो. त्यावेळी त्याच्या पाठीवर सामानाने भरलेली मोठी बॅग दिसत आहे. तसेच हातातही एक लहान बॅग असल्याचे दिसते. त्यांनतर तो लिफ्टमध्ये चढून आपल्या खोलीपर्यंत येतो. काही वेळाने पुन्हा खोलीबाहेर येऊन तो त्याच लिफ्टच्या सहाय्याने खाली येऊन हॉटेलबाहेर जातो. दरम्यान थोड्याच वेळात तेथे मोठा स्फोट झाल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.