बीजींग- २५ वर्षांपूर्वी 'दलाई लामा' यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर गायब झालेला मुलगा, आता कॉलेज ग्रॅज्युएट झाला असून त्याला नोकरीही लागली असल्याचे चीन सरकारने स्पष्ट केले आहे. गेधुन चोईक्यी न्यिमा हा सहा वर्षाचा असताना त्याला ११वा 'पांचेन लामा' म्हणून निवडण्यात आले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाला, आणि त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र चीनने आता हा मुलगा पदवीधर झाल्याचे सांगितले आहे.
तिबेट हा आपलाच भूभाग आहे, असे म्हणणाऱ्या चीनने, दलाई लामाचा उत्तराधिकारी म्हणून दुसऱ्याच एका मुलाची निवड केली आहे. ग्याल्टसेन नोर्बू असे नाव असलेल्या या मुलाने आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ बीजींगमध्ये व्यतीत केला आहे. पूर्णपणे बीजींगच्या ताब्यात असलेला एक राजकीय नेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेधुन न्यिमा याला चीन सरकारकडून सक्तीचे मोफत शिक्षण देण्यात आले. त्यानंतर तो पदवीधर झाला असून, त्याला आता एक नोकरीही आहे. तो आता ३१ वर्षांचा असून, त्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही ढवळाढवळ नको आहे. याहून अधिक माहिती देण्यास झाओ यांनी नकार दिला.
तिबेटमध्ये बौद्ध धर्माच्या धर्मगुरूला अजूनही मानाचे स्थान आहे. तिबेट, भूतानमधील बहुतांश लोक या व्यक्तीच्या आदेशांचे पालन करतात. त्यामुळेच, दलाई लामा आणि बीजींगमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम या सर्व लोकांवरही होणार आहे. तिबेट आणि हिमालयाच्या आजूबाजूचा प्रांत हा आपलाच असल्याचे चीन शतकानूशतके सांगत आला आहे. मात्र, या भागात राहणारे लोक स्वतःला चीनचे रहिवासी नाही, तर आपण स्वतंत्र असल्याचे सांगत आले आहेत.
तिबेटच्या स्वयंघोषित सरकारने गेधुन न्यिमाच्या बेपत्ता होण्याच्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त, बीजींगशी संपर्क साधत त्याच्याबाबत माहिती मागवली होती. त्यानंतर चीनने ही माहिती जाहीर केली.
"पांचेन लामा याचे अपहरण करणे, त्याची धार्मिक ओळख नकारणे आणि त्याचा मठामध्ये अभ्यास करण्याचा हक्क हिरावून घेणे; हे केवळ धार्मिक स्वातंत्र्याचे नाही तर मानवी हक्कांचेही दुर्दैवी उल्लंघन आहे" असे मत 'काशग'ने (उत्तर भारतात असलेली तिबेटची संसद) व्यक्त केले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनीदेखील चीनला पांचेन लामाबाबत सर्व माहिती जाहीर करण्याचे आवाहन केले. तर, कागशचे अध्यक्ष लोबसांग सांग्ये यांनी याबाबत पॉम्पेओचे आभार मानले आहेत. पांचेन लामा याच्या सुटकेसाठी अमेरिकी सरकार हे सातत्याने प्रयत्न करत आले आहे. यासोबतच, सोमवारी त्यांनी चीनला दिलेल्या इशाऱ्यावरूनच अमेरिकेची तिबेटी लोकांप्रती असलेली एकात्मतेची भावना दिसून येते, असे लोबसांग म्हणाले.
दलाई लामा यांनी तिबेटमधील चिन्हांची भाषा वाचण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या इतर लामांच्या मदतीने पांचेन लामाची निवड केली होती. मात्र चीनच्या मते, दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड ही केवळ सोन्याच्या कलशातून चिठ्ठी उचलून केली जाऊ शकते. ही पद्धत चीनच्या सत्ताधारी नास्तिक कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली वापरली जाते.
परंपरेनुसार, पांचेन लामा याने दलाई लामांसोबत शिक्षक म्हणून, तसेच त्यांचा सहकारी म्हणून काम करणे अपेक्षित असते. दलाई लामा हे तिबेटी बौद्धांचे सर्वोच्च गुरू आहेत. त्यांचे वय सध्या ८४ वर्षे असून, चीनने त्यांच्यावर तिबेटला स्वतंत्र केल्याचा आरोप ठेवला आहे. तर दलाई लामांनी हा आरोप फेटाळून लावत, आपण या प्रांतासाठी अधिकाधिक स्वायत्ततेचा पुरस्कार करत असल्याचे म्हटले आहे.