बिजिंग - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असे वाटत असतानाच आता चीनमधूनच पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये 21 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. आता येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 82 हजार 941 वर पोहोचली आहे.
हुबेईमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 4 हजार 512 एवढा आहे. यामध्ये वुहानमधील 3 हजार 869 जणांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 68 हजार 134 कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये वुहानमधील 50 हजार 339 जणांचा समावेश आहेत.
चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे केंद्रस्थान असलेल्या वुहान शहराची लोकसंख्या 11 दशलक्ष आहे. 11 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहरातील सर्वांच्या चाचण्या घेण्याचा विचार चीन सरकारने केला आहे. याबाबत दहा दिवसांची चाचणी योजना तयार करण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले आहेत.
चीनमध्ये शुक्रवारपर्यंत एकूण 82 हजार 941 कोरोनाबाधित प्रकरणे नोंदवली आहेत. यामध्ये 89 अॅक्टीव्ह आहेत. तर 78 हजार 219 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 4 हजार 633 जणांचा मृत्यू झाला आहे.