चीनकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध; मात्र, मसूदला ठोस विरोध नाहीच - wang yi
चीनने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. चीनचे स्टेट काउंसिलर आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
बीजिंग - चीनने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. चीनचे स्टेट काउंसिलर आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र विरोध करत असून शेजारील देशांनी दहशतवाद या विषयावर एकत्र यायला हवे, यातून त्यांचा बीमोड करता येईल, असे म्हटले आहे.
काश्मीरमध्ये हल्ला झाला आहे आणि या हल्ल्यात भारताचे बरेच जवान हुतात्मा झाले आहेत, अशी बातमी ज्यावेळी मला समजली त्यावेळी मी स्तब्ध झालो. दहशतवाद हा मानवतेचा मोठा शत्रू आहे. त्यामुळे चीन त्याचा तीव्र निषेध करतो, असे वांग यी यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पाठवलेल्या शोक संदेशात म्हटले आहे.
'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने गुरुवारी पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या संघटनेचा मोऱ्हक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यास वेळोवेळी चीनने अटकाव केला आहे. तो आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झाल्यास त्याच्या जगातील इतर देशांमध्ये जाण्यावर निर्बंध येतात. त्याची संपत्ती जप्त करता येऊ शकते.
चीनकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा व्हिटो अधिकार आहे. याद्वारे चीनने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास विरोध केला आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी केलेल्या मागणीला त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे पुलवामा हल्ल्याचा पोकळ निषेध म्हणजे 'मगरमछ के आंसू' आहेत असे म्हणता येईल.