अवकाशावर वर्चस्व गाजवण्यासाठी अमेरिकेची 'स्पेस फोर्स'; चीनचा जळफळाट - china on space force
अमेरिकेने नुकतेच 'स्पेस फोर्स' म्हणजेच अवकाश सुरक्षा दल हा नवा लष्करी विभाग सुरू केला आहे. यावरून चीनचा जळफळाट सुरू आहे.
बिजींग - अमेरिकेने नुकतेच 'स्पेस फोर्स' म्हणजेच अवकाश सुरक्षा दल हा नवा लष्करी विभाग सुरू केला आहे. अवकाश हे युद्ध लढण्याचं नवं क्षेत्र असल्याचे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी यासाठी मान्यता दिली. राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन या दलाची स्थापना केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, चीनने अमेरिकेच्या या निर्णयावर शांततेला धोका असल्याचे म्हणत टीका केली आहे.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनची चिंता वाढली असून आमचा या निर्णयाला विरोध आहे. अवकाशाचा सर्व राष्ट्रांनी शांतेत वापर करण्याच्या तत्वाचे अमेरिकेने उल्लंघन केले आहे. यामुळे जागतिक संतुलन ढासळून अस्थिरता येण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे अवकाशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी सांगितले.
चीनचा अवकाश कार्यक्रम मागील काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. मागील वर्षी अमेरिकेच्या पेंटॅगॉन या सुरक्षा मुख्यालयाने एका अहवाल तयार केला होता. त्यामध्ये युद्ध किंवा तणावाच्या काळात चीन आणि रशिया मिळून अमेरिकेचे उपग्रह नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अमेरिकने सुरक्षेच्या दृष्टीने स्पेस फोर्स तयार करण्यासाठी पावले उचलली. चीनने २००७ साली अवकाशातील स्वत:चाच एक निकामी उपग्रह क्षेपणास्त्राने उडवून दिला होता. त्यावेळीही अवकाश सुरक्षेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
जगातील मोठे देश अवकाशामध्ये शांतता बाळगण्यासाठी जपून पावले उचलतील. तसेच अवकाश ही एक नवी युद्ध भूमी होण्यापासून रोखतील, अशी आशा शुआंग यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनपुढे आव्हान उभे राहिले असल्याचे दिसून येत आहे.
काय आहे स्पेस फोर्स?
अमेरिकेने देशाच्या संरक्षणासाठी लष्कराचा सहावा विभाग तयार केला आहे. त्याला 'स्पेस फोर्स' असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे अमेरिका आपल्या अवकाशातील उपग्रहांचे शत्रू देशांपासून संरक्षण करणार आहे. तसेच अवकाशामध्ये घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. अमेरिकेला मुख्यत: चीन आणि रशियापासून धोका वाटत आहे. त्यामुळे भविष्याकडे नजर ठेवत अमेरिकेने अवकाश सुरक्षा दलाची निर्मिती केल्याचे दिसत आहे.