बीजिंग -चीनने आपले कुटुंब नियोजन धोरण अधिकृतपणे शिथिल केले आहे. आतापासून चीनमधील दाम्पत्यास तीन मुले होण्याची अधिकृत परवानगी असणार आहे. यापूर्वी लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यासाठी चीनकडून 'वन चाइल्ड पॉलिसी' राबवण्यात आली होती. ही पॉलिसी चीनने 2015 मध्ये संपुष्टात आणली आणि एका जोडप्याला दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली होती. आता चीनमध्ये एका जोडप्याला 2 ऐवजी 3 अपत्यांना जन्म देता येईल. वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सने ही माहिती दिली.
चीनच्या लोकसंख्येची रचना सुधारणे आणि देशातील वाढत्या वयाच्या समस्येवर लक्ष घालणे हा यामागील हेतू आहे. चीन अधिकार्यांनी प्रसूती रजा, प्रसूती विमा प्रणाली सुधारित करण्याचा आणि कर, गृहनिर्माण यासारख्या क्षेत्रांमध्ये सहाय्यक धोरणांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे. चीनमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या वाढली आहे. ज्याचा प्रभाव समाज आणि अर्थव्यवस्थेवर पडतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सत्ताधारी पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वृद्धांची वाढती लोकसंख्येला सक्रियपणे सामोरे जाण्यासाठी चीन मोठी धोरणे आणि उपाययोजना आणणार आहे. चीनची लोकसंख्या रचना सुधारली जाऊ शकते. 'वन चाइल्ड पॉलिसी' बंद करून 2015 मध्ये नियम शिथिल करण्यात आले आणि दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली होती. एक वर्षानंतर मुलांची संख्या वाढली पण नंतर ती कमी होताना दिसून आली आहे.
भारत लोकसंख्येत 2027 पूर्वीच चीनला मागे टाकणार -
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात चीन खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार 2027 पूर्वीच भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल. भारताची लोकसंख्या आतापासून ते 2050 च्या दरम्यान सुमारे 27 कोटी 30 लाख लोकांची वाढण्याची शक्यता आहे. तसेच 2027 पर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या अहवालात वर्तवला होता. मात्र, चीनने कुटुंब नियोजन धोरण बदलल्याने भारत चीनला मागे टाकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.