टोकियो- प्रकृती अस्वास्थ्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीमाना दिल्यानंतर पंतप्रधान पदासाठी सत्ताधारी पक्षात शयर्त सुरू झाली आहे. जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रटीक पक्षाच्या अध्यक्षाची पंतप्रधानपदी नियुक्ती केली जाते. आबे अध्यक्षपदावरून म्हणजेच पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर आता नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी पाठिंबा मिळविण्यसाठी अभियान सुरू केले आहे.
मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगा(७१) यांनी मागील आठवड्यात अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच सुगा यांच्यापेक्षा कमी वयाच्या आणखी दोन प्रतिस्पर्ध्यांनीही अर्ज दाखल केला आहे. यामध्ये माजी संरक्षण मंत्री शिंगेरू इशिबा आणि माजी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांचा समावेश आहे.
१४ सप्टेंबरला नव्या अध्यक्षासाठी पक्षांतर्गत मतदान होणार आहे. नवनियुक्त अध्यक्षाची देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती होणार आहे. सुगा यांना अध्यक्षपदासाठी समर्थन मिळताना दिसत असून त्यांचे पक्षातील वजनही जास्त आहे. आबे यांची धोरणे आणि योजना पुढे नेण्यासाठी आश्वासक म्हणून नेता म्हणून सुगा यांच्याकडे पाहिले जात आहे. माध्यमातील पोलमधूनही सुगा इशिबा इतर उमेदवारांच्या पुढे निघाल्याचे दिसून येत आहे.