नवी दिल्ली : आक्रमक धोरण टोकाला नेण्याची एकतर्फी लष्करी इच्छाशक्ति आणि मनीषा मजबूत करण्याच्या ताठर पवित्र्याचे संकेत चीनने दिले आहेत. त्या देशाने भारत केंद्रित अगदी जवळच्या हवाई तळावर, चोरट्या पद्धतीने हल्ला करणारी जे-२० विमानांची जमवाजमव सुरू केली आहे. याद्वारे भारताशी असलेल्या तणावपूर्ण संघर्षाचा आणखी एक थर वाढवला आहे.
सैनिकी परिक्षण उपग्रहाने पाठवलेली अलिकडची छायाचित्रे असे दाखवत आहेत की, पीएलएएएफने (पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स) जे-२० ही चोरून हल्ला करणारी लढाऊ विमाने होटन हवाई तळावर आणून ठेवली आहेत. यामुळे भारताशी असलेल्या तणावपूर्ण संघर्षाचा आणखी एक थर वाढवला आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून १३० किलोमीटर दूर असलेला, होटन हा उत्तरेत भारतीय सीमेपासून सर्वात जवळचा पीएलएएएफचा हवाई तळ आहे. पीएलएच्या पाश्चात्य लष्करी कमांडकडून कार्यान्वित झालेल्या, होटन हवाई तळावर अगोदरच जे-१० आणि जे-११ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. आता तेथे आणलेल्या नव्या विमानांमध्ये जे-८ आणि जे-१६ एस या विमानांची भर पडली आहे.
भारताशी असलेल्या द्वेषाचा खुलेपणाने उद्रेक झाला तर चीन आता पायदळापेक्षा हवाई दल, क्षेपणास्त्र आणि ड्रोनसारख्या साधनांवर पीएलए जास्त भर देईल, याबद्दल काहीच शंका नाही, या दृष्टिने ही करण्यात आलेली तैनाती महत्वाची आहे.
भारताने आपल्याकडूनही, गरज पडल्यास कारवाई करण्यासाठी, लेह विमानतळावर एलएसीनजीक मोठ्या प्रमाणावर शक्तिशाली हवाई आरमार तैनात केले आहे. यामध्ये सुखोई-३० आणि मिग २९ के लढाऊ विमाने, सी-१७ एअरलिफ्टर्स, पी ८ सैनिकी परिक्षण विमाने, हल्ला करण्यास सक्षम असलेली चिनुक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स, विविध प्रकारची इतर विमाने आणि युएव्ही यांचा समावेश आहे.
एलएसीच्या दोन्ही बाजूंना आघाडीवर महत्वाच्या क्षेत्रावर, दोन्ही देशांनी एक लाखांहून अधिक सैनिक आणि विशाल साधनसामग्रीचा साठा तैनात केला आहे. यात अवजड बंदुकांचाही समावेश आहे. चार महिन्यांपासून एकमेकांचा सामना करणार्या सैनिकी संघर्षामध्ये सर्वंकष युद्ध पेटवण्याची भयानक क्षमता आहे.
चेंगडु एअरक्राफ्ट डिझाईन इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या आणि पीएलएएएफने सप्टेंबर २०१७ मध्ये कार्यान्वित केलेल्या, पाचव्या आवृत्तीच्या जे-२० विमानांचे सामूहिक उत्पादन करण्यास चीनने अगदी अलिकडेच सुरूवात केल्याचे मानले जाते.पुढील २० वर्षे ही विमाने पीएलएएएफचा कणा असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.