कोलंबो - श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये ईस्टर संडेदिवशी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले आहेत. या स्फोटांमध्ये १५६ ठार तर, २०० हून अधिक जखमी झाले आहेत. यात ३५ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले.
कोच्छिकाडे, निगोम्बो या २ ठिकाणची सेंट अँटोनी'ज चर्च, काटुवापिटिया येथील सेंट सेबॅस्टिन्स चर्च आणि बट्टीकलोआ येथील झियोन चर्च येथे हे बॉम्बस्फोट झाले. तसेच, किंग्सबरी, शांग्री-ला आणि सिनॅमॉन ग्रँड या कोलम्बोमधील हॉटेलांमध्येही बॉम्बस्फोट झाले. सकाळी पावणेआठच्या सुमारास हे स्फोट झाले. बचावकार्यास सुरुवात झाली आहे. जखमींना कोलम्बो राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटांनंतर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे.