इस्लामाबाद :पाकिस्तानच्या पेशावरमध्ये असलेल्या दिर कॉलनीमध्ये एका मदरशाजवळ आज स्फोट झाला. यामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला असून, 70हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या एका आघाडीच्या वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.
जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश..
मदरशाजवळ हा स्फोट झाल्यामुळे जखमींमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १९हून अधिक लहान मुले गंभीर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
याठिकाणी तातडीने बचावकार्यास सुरुवात झाली असून, जखमींना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोट भीषण असल्यामुळे, आणि जखमींची परिस्थिती गंभीर असल्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आठवड्यातील तिसरी घटना..
रविवारीच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्येही एक स्फोट झाला होता. या स्फोटात ३ जण ठार झाले तर ७ जण जखमी झाले होते. क्वेट्टा शहरातील हजरतगंज मार्केटमध्ये ही घटना घडली. विरोधकांनी रॅलीचे आयोजन केले असतानाच शहर स्फोटाने हादरले होते. तर, त्यापूर्वी २० ऑक्टोबरला कराचीमध्ये गुलशन-ए-इक्बालमधील या ठिकाणी झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला होता.
कराची स्फोटाची धग अजूनही कायम
पाकिस्तानच्या कराचीमध्ये २० ऑक्टोबरला सकाळी भीषण स्फोट झाला होता. यामध्ये पाच जण ठार झाले होते तर १५ जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कराची विद्यापीठाच्या मस्कान गेटसमोरील एका चार मजली इमारतीत हा स्फोट झाला होता. हा स्फोट म्हणजे दुर्घटना होती, की हल्ला होता याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलीस सध्या याबाबत तपास करत आहेत. या स्फोटाची तीव्रता एवढी होती, की आजूबाजूच्या इमारतींच्या काचाही त्यामुळे फुटल्या अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. कराची स्फोटाची धग अजूनही कायम असताना आता पेशावरमध्ये स्फोट झाला आहे. म्हणजेच दहशतवादी संघटना आता अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा :सीरियामध्ये एअरस्ट्राईक! ५० हून अधिक बंडखोर सैनिक ठार