बिजिंग - चीनने देशाच्या आग्नेय किनाऱ्यावर म्हणजेच तैवानच्या जवळ लष्करी सामर्थ्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिनी लष्कर तैवानवर लवकरच आक्रमण करण्याची तयारी करत असल्याचा आरोप संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. चीनने तैवान जवळच्या किनारी भागातील लष्करी तळांवरील जुनी क्षेपणास्त्रे बदलून नवी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बसविण्यास सुरुवात केली आहे.
डाँगफेंग ही चिनी बनावटीची प्रमुख क्षेपणास्त्रे असून आग्नेय किनाऱ्यावरील डीएफ-११, डीएफ -१५ या जुन्या क्षेपणास्त्रांना बदलून तेथे डीएफ-१७ ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बसविण्यास सुरुवात केली आहे. ही नवी क्षेपणास्त्रे अधिक अचुकपणे लक्ष्यावर मारा करू शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
चीनच्या मरीन कॉर्प्स आणि मिसाईल फोर्स विभागाने फुजान आणि गँगडाँग तळावरी शस्त्रात्रे वाढविल्याची माहिती कॅनडातील संरक्षण विषयक अभ्यास गटाने दिली आहे. तैवानजवळील हे लष्करी तळ हल्ला करण्यास पूर्णपणे सुसज्ज करण्यात आले आहेत. मागील काही वर्षात या भागात क्षेपणास्त्रांची संख्या दुप्पटीने वाढविण्यात आल्याचे अभ्यास गटाने सांगितले आहे.
अमेरिकेबरोबरच्या वादामुळे चीन सावध
हाँगकाँग, तैवान, व्यापार युद्ध, दक्षिण चिनी समुद्र या विषयांवरून अमेरिका आणि चीनमधील संबंध मागील काही दिवसांपासून बिघडले आहेत. अमेरिकेचा मोठा लष्करी जहाजांचा ताफा दक्षिण चिनी समुद्रात चीनचा प्रभाव रोखण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. दोन्ही देशांतील वादानंतर आशियायी भू-राजकीय क्षेत्रात वेगाने घडामोडी घडत आहेत. चीनविरोधात भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचा कॉड गट तयार होत आहे. संपूर्ण पॅसिफिक समुद्र आणि आशिया खंडावर अधिराज्य गाजविण्याची चीनची आकांक्षा असून त्या विरोधात जगातील अनेक देश एकत्र येत आहेत.