इस्लामाबाद - पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकार आणि लष्कराविरोधात जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनात ११ विरोधी पक्षांनी सहभाग घेतला असून त्यांच्याकडून देशभर सरकार विरोधात निदर्शने आणि आंदोलने सुरू आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. इम्रान खान हे लष्कराने पंतप्रधान पदावर बसविलेले प्यादे असून खरी सत्ता लष्कराच्या हातात आहे. देशात खरी लोकशाही आणण्यासाठी इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
लष्कराला दिला थेट इशारा
दरम्यान, आज जमात उलेमा-ई-इस्लाम (जेयूफ) पक्षाचे नेते फजलूर रेहमान यांनी सभा घेत पाकिस्तानी लष्करावर हल्लाबोल केला. लष्कराने सरकार, पोलिस आणि नागरी कामकाजात लुडबुड करणं थांबवावे, अन्यथा देशात ऐकी राहणार नाही, असा इशारा त्यांनी लष्कराला दिला. आत्तापर्यंत पाकिस्तानातील कोणत्याही विरोधी पक्षाने पाकिस्तानी लष्करावर थेट हल्ला केला नव्हता. मात्र, इंग्लमधून भाषण करताना सर्वात प्रथम माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांनी लष्करावर निशाणा साधल्यानंतर आज फजलूर रेहमान यांनी लष्कराला इशारा दिला.