काबूल -तब्बल दोन दशकांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यावर अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हाती आली आहे. आज तालिबानकडून नमाजानंतर नव्या सरकारची घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रपती भवनामध्ये नव्या सरकारची घोषणा केली जाण्याची माहिती आहे. मुल्ला हेबतुल्ला अखुंदजादा हे देशाचे सर्वोच्च नेता होऊ शकतात. पंतप्रधानपदी अब्दुल गनी बरादर किंवा मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला याकूबची निवड होऊ शकते.
नवे सरकार स्थापन करण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. तसेच मंत्रिमंडळाबाबत आवश्यक निर्णयही घेण्यात आले आहेत. ज्या इस्लामिक सरकारची घोषणा आम्ही करणार आहोत, ते लोकांसाठी एक उदाहरण ठरेल, असे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनमुल्ला समनगनी यांनी सांगितलं. तर सरकारमध्ये महिलांची काय भूमिका असेल, यावर अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.
अफगाणिस्तानात सत्ता मिळवली असली तरी तालिबान दिशाहीनतेमुळे सैरभैर झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे. अफगाण सरकारमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावर येण्यास तालिबानने सांगितले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानला इस्लामिक प्रजासत्ताक देश बनवल्याच्या आनंदात तालिबानने मुद्दाम सरकार स्थापन करण्यासाठी नमाजाचा दिवस निवडला आहे. तसेच सरकार स्थापन करण्यात आणि ते चालवण्यात मोठा फरक असतो. त्यामुळे तालिबान अफगाणिस्तान सक्षम रित्या चालवू शकेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.