काबूल : युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील शेबर्गन शहरातील तालिबानच्या छुप्या तळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या शहरावर तालिबानने अलिकडेच ताबा मिळविला होता. दरम्यान, अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या प्रांतांत गेल्या 24 तासांत सुरक्षा दलाने राबविलेल्या मोहिमेत 385 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.
तालिबानी आले होते एकत्र
शेबर्गनवर ताबा मिळविल्यानंतर शहरातील एका छुप्या तळावर आयोजित एका कार्यक्रमासाठी तालिबानी दहशतवादी एकत्र आले होते. याच वेळी हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. यादरम्यान 200 हून अधिक दहशतवादी मारले गेले असून 100 हून अधिक वाहने तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा नष्ट झाल्याचे अफगाण संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमन यांनी म्हटले आहे.
बी-52 बॉम्बरने हवाई हल्ला
जॉझान प्रांतातील शेबर्गन शहरात आयोजित या कार्यक्रमावर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बी-52 बॉम्बरच्या सहाय्याने हवाई हल्ला करण्यात आला. यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी गझनी प्रांत केंद्राच्या जवळून एका पाकिस्तानी दहशतवाद्यास अफगाण कमांडोंनी अटक केली होती. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. सरकारी सैन्यासोबत आठवडाभराच्या संघर्षानंतर जॉझान प्रांताची राजधानी तालिबानच्या ताब्यात गेली होती असे टोलो न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.