काबूल-अफगाणिस्तानमध्ये एका मुलीने आई-वडिलांना गोळी मारुन त्यांचा जीव घेणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही घटना मागील आठवड्यात घडल्याची माहिती तेथील सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी मुलीच्या आई-वडिलांना त्यांच्या घरासमोर गोळ्या घातल्या होत्या. कमर गुल असे 14 ते 16 वर्षीय मुलीचे नाव आहे.
अफगाणिस्तानच्या मध्य प्रांतातील घोर मध्ये ही घटना घडल्याचे गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
गुलचे वडील गावाचे प्रमुख होते. दहशतवादी त्यांच्या शोधात आले होते, असे स्थानिक पोलीस अधिकारी हबिबुरहमान मलेकझादा यांनी माध्यमांना सांगितले. गुलचे वडील सरकारचे समर्थक होते. त्यामुळे दहशतवादी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना घराबाहेर आणले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी गुल हिच्या आईने दहशतवाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी दोघांनाही गोळ्या घातल्या, असे मलेकझादा यांनी सांगितले.
ही घटना घडत असताना कमर गुल ही घरात होती. तिने घरातील एके-47 बंदुक घेतली आणि बाहेर येत आई-वडिलांना मारणाऱ्या दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला आणि इतरांना जखमी केले. यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी बदला घेण्यासाठी आले होते. मात्र, गावकरी आणि सरकारी सैनिकांनी त्यांना परतवून लावले.
गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांचे अफगाण सैन्यावरील हल्ले वाढले आहेत.