लाहोर -दहशतवाद्यांचे नंदनवन मानले जाणारे पाकिस्तान हे बॉम्बस्फोटाने हादरले आहे. पाकिस्तानच्या वायव्य भागात असलेल्या दुर्गम भागात बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 9 चिनी नागरिकांसह 13 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा बॉम्बस्फोट चिनी नागरिकांना ठार मारण्यासाठी होता की अन्य कारणाने याबाबतची माहिती समोर आली नाही.
पाकिस्तानमधील चीनच्या राजदूत कार्यालयाने बॉम्बस्फोटात चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी दिली आहे. पाकिस्तानमधील काही चिनी कंपन्यांच्या प्रकल्पांवर हल्ले करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या घटनेची चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिज्जान यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची पाकिस्तान सरकारकडे मागणी केली आहे.
हेही वाचा-केरळमध्ये आणखी आढळले 2 'झिका'चे रुग्ण
पाकिस्तानकडून बॉम्बस्फोटाबाबत तपास सुरू-
बॉम्बस्फोटाबाबत तपास सुरू असल्याचे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पाकिस्तानची प्रतिमा बिघडविण्यासाठी हे बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत.