काठमांडू :नेपाळच्या सिराहा जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात झालेल्या स्फोटात आठ जण जखमी झाले. गर्दी असलेल्या या कार्यालयात रविवारी झालेला स्फोट हा 'प्रेशर कुकर बॉम्ब' असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी कृष्णकुमार निरौला यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जमीन महसूल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला. यामध्ये जमीन महसूल विभागातील पाच पुरुष आणि तीन महिला असे एकूण आठ कर्मचारी जखमी झाले.
तिघांची प्रकृती गंभीर..
या स्फोटात जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सप्तर्षी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांवर लहान रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डीएसपी तपन दहाल यांनी दिली.
जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा संघटनेवर संशय..
दरम्यान पोलिसांनी सांगितले, की घटनास्थळावरुन त्यांना जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा (क्रांतीकारक) या संघटनेचे पॅम्फ्लेट मिळाले आहेत. जयकृष्ण गोईत हे या सशस्त्र संघटनेचे प्रमुख आहेत. या कागदांचे तुकडे तुकडे झाल्यामुळे त्यावर काय लिहिले होते हे अद्याप समजले नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, यावर जयकृष्ण गोईत यांची सही असल्याचे दिसून येत आहे असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा :नेपाळमधील सध्याची राजकीय स्थिती के.पी. ओली यांच्यासाठी पोषक?