हनोई : मध्य व्हिएतनामच्या क्वांग नाम प्रांतात बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) दोनवेळा भूस्खलन झाले. रात्री अकराच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ जण बेपत्ता झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने याबाबत माहिती दिली.
नाम त्रा माय या जिल्ह्यात मॉलाव्ह या चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळेच भूस्खलनाच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिएतनामचे पंतप्रधान न्ग्युयेन क्सुआन फुक यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद समितीला जोमाने बचावकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
महिनाभर सुरू आहे पावसाचे तांडव..
या महिन्यात व्हिएतनामध्ये भूस्खलनात १००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १७ ऑक्टोबरला झालेल्या भूस्खलनांमध्ये एका लष्करी छावणीवर दरड कोसळून सुमारे २२ जवान दबले गेले होते. त्याच दिवशी एका जलविद्युत प्रकल्प बांधकाम ठिकाणी 16 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर १९ ऑक्टोबरला विविध ठिकाणी पूर आणि भूस्खलनांच्या घटनांमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला होता, तर ३४ बेपत्ता झाले होते. स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, सर्वाधिक मृत्यू क्वांग ट्राय, थुआ थिएन ह्यू आणि क्वांग नेम या प्रांतांमध्ये झाले होते.
लाखो लोकांचे स्थलांतर, जनावरांचा मृत्यू..
आपत्ती प्रतिसाद समितीने दिलेल्या माहितीनुसार, हा तिन्ह, क्वांग बिन्ह, क्वांग ट्राय आणि थुआ थिन ह्यू भागांतील 1 लाख 21 हजार 280 लोकांना सुरक्षित भागात हलवण्यात आले. अद्याप सुमारे 1 लाख 21 हजार 700 घरे पूरग्रस्त आहेत. 6 ऑक्टोबरपासून या भागांतील 5 लाख 31 हजार 800 जनावरे आणि कोंबड्यांसारखे पाळीव पक्षी मारले गेले किंवा वाहून गेले आहेत, असे समितीने म्हटले आहे.