कोरोना: चीनमध्ये ४१ जण दगावले, हजाराहून अधिक नागरिकांना संसर्ग
अनेक देशांनी चीनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी विमानतळावर पथके स्थापन केली आहेत. कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांपासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना वेगळे ठेवण्यात येत आहे.
बीजिंग-कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे (विषाणू) संपूर्ण चीनमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आत्तापर्यंत या विषाणूमुळे चीनमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजार पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून देशाच्या अनेक प्रांतातील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त रुग्ण चीनमधील हुबेई प्रांतात सापडले आहेत.
अनेक देशांनी चीनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी विमानतळावर पथके स्थापन केली आहेत. कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांपासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना वेगळे ठेवण्यात येत आहे. फक्त चीनच नाही तर आता थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, अमेरिका फ्रान्स देशांमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे निमोनियासारखी गंभीर लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात. सौदी अरेबियातही एका भारतीय नर्सलाही या विषाणूची लागण झाली आहे. केरळ राज्याने सर्व विमानतळावर तपासणी पथकाची स्थापना केली आहे. या व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
अनेक देशांनी चीनमध्ये प्रवास करण्याबाबत नियमावली जारी केली आहे. मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहर आणि आजूबाजूच्या प्रांतात या कोरोना व्हायरसने प्रभावित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे.
काय आहे कोरोना व्हायरस ?
कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. आधीच एखादा आजार असणाऱ्या रुग्णांना या व्हायरसचा जास्त धोका असतो.