ढाका- संपूर्ण बांग्लादेशमध्ये आंदोलनाचे लोळ उठवणाऱ्या नुसरत जहाँ खटल्याचा निकाल गुरुवारी लागला आहे. बांग्लादेशच्या न्यायालयाने १६ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घेत नाही, म्हणून मदरशाचे प्राचार्य आणि सहकाऱ्यांनी तरुणीला जिवंत जाळले होते. त्यानंतर देशभरामध्ये तरुणीच्या न्यायासाठी आंदोलनाचे लोन पसरले होते.
हेही वाचा -बलात्कारप्रकरणी रोनाल्डोचा पाय खोलात, २००९ चे होते प्रकरण
नुसरत जहाँ रफी नावाची तरुणी सोनागाझी इस्लामिया फैजल या मदरशामध्ये शिकत होती. तेथील प्राचार्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुणीने केला होता. याप्रकरणी १० दिवसांनंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी प्राचार्यां एस. एम सिराजउद्दौला यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रार मागे घेण्यास तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यातून प्राचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ६ एप्रिलला मदरशाच्या छतावर तरुणीला जिवंत जाळले होते. आरोपींमध्ये मदशातील काही माजी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
हेही वाचा -व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने रशियन महिलेवर पोलिसाचा सतत 12 वर्षे बलात्कार
जखमी अवस्थेत तरुणीला ढाका मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर भाजल्याने चौथ्या दिवशी तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर देशभरामध्ये तरुणीला न्याय देण्यासाठी आंदोलन पेटले होते. याप्रकरणी पोलिसांनीही तत्काळ आरोपींना ताब्यात घेतले. या खटल्याची जलद सुनावणी करत न्यायालयाने ६१ दिवसांमध्ये निकाल दिला. तरुणीच्या हत्येप्रकरणी १६ जण दोषी आढळून आले असून सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. तसेच प्रत्येक आरोपीला १ लाख दंडही ठोठावण्यात आला. ही रक्कम मृत तरुणीच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. नुसरतला न्याय मिळाल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. तसेच लवकरात लवकर न्याय मिळवून दिल्यामुळे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे आभार मानले.