काबूल -पाकिस्तानचा व्हिसा घेण्यासाठी बुधवारी अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात प्रचंड लोकांची गर्दी जमली होती. येथे अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 15 जण लोकांच्या पायांखाली चिरडून मृत्युमुखी पडले. यात 12 महिलांचा समावेश होता. तर, अनेकजण जखमी झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानच्या दूतावासानजिक घडली. नंगरहार प्रांतातील सरकारचे प्रवक्ते अत्ताउल्लाह खोगयानी यांच्या हवाल्याने टोलो न्यूजने हे वृत्त दिले आहे.
हेही वाचा -अल कायदाची तालिबानशी जवळीक राहणारच - संयुक्त राष्ट्र अधिकारी
दूतावासाच्या बाहेर रोजच्या प्रमाणे हजारो लोक जमले होते. काहीजण तर रात्रीपासून येथील रांगेमध्ये थांबले होते.
या घटनेवर पाकिस्तानच्या दूतावासाने टि्वट करत मृतांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत. 'पाकिस्तानी वाणिज्य दूतावासापासून 5 किलोमीटरवर जलालाबादच्या एका स्टेडियममध्ये अफगाण प्रांतीय अधिकाऱ्याद्वारे व्हिसा अर्जदारांसाठी चालू असलेल्या केंद्रावर लोकांचा मोठा जमाव होऊन चेंगराचेंगरी झाली. यात काही मृत्यू झाल्याची वृत्तामुळे आम्हाला खूप दुःख होत आहे. आम्ही पीडित कुटुंबीयांसाठी सहानुभूती व्यक्त करतो,' अशी प्रतिक्रिया पाक दूतावासाने दिली आहे.
हेही वाचा -नायजेरियात आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा गोळीबार, १२ नागरिकांचा मृत्यू