बीजिंग : युरोपनंतर चीनमध्ये अतिवृष्टी आणि पुराचे थैमान बघायला मिळत असून या भीषण पुरात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. चीनच्या मध्य हेनान प्रांताला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. प्रांतात गेल्या एक हजार वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून यामुळे इथे अक्षरशः जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला तातडीने मदत कार्य राबविण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक प्रत्यक्षदर्शी या महाभयंकर पुराचे वर्णन जगबुडीसारखे करत आहेत.
गाड्या, घरे कागदाप्रमाणे गेले वाहून
या महापुराविषयीचे अनेक व्हिडिओ चीनी सोशल मीडियातून शेअर केले जात आहेत. यावरून तिथल्या भीषण परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. सबवे रेल्वेत छातीपर्यंत साचलेल्या पाण्यात नागरिक मदतीची वाट बघत उभे असल्याचे तसेच कार आणि घरे पुराच्या लाटेत अगदी कागदाप्रमाणे वाहून जात असल्याचे चित्र या व्हिडिओत बघायला मिळत आहे. तर सरकारी संस्थांनी तत्काळ मदतकार्य राबविले जात असल्याचे व्हिडिओ जारी केले आहेत.
24 तासांत 457.5 मिमी पाऊस, 1000 वर्षांतील सर्वाधिक पाऊस
पावसाच्या आकडेवारीनुसार झेंगझोऊ शहरात मंगळवारी चोवीस तासांतच 457.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची नोंद घेण्यास सुरूवात झाल्यापासून ते आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याचे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार हा पाऊस गत एक हजार वर्षांमधील सर्वाधिक आहे.