वॉशिंग्टन -अमेरिकेत भडकाऊ पोस्ट न हटवल्याबद्दल फेसबुकवर आरोप झाले आहेत. फेसबुककडून ही चूक झाल्याचे कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मान्य केले आहे. मात्र, ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत या प्रकरणी झुकेरबर्ग यांनी माफी मागितलेली नाही. जेकब ब्लेक याला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केल्यानंतर येथे हिंसक निदर्शने उसळली होती. यादरम्यान येथील एका सशस्त्र गटाने नागरिकांना शस्त्रे घेऊन केनोशा, विस्कॉन्सिन शहरात दाखल होण्याचे आवाहन फेसबुक पेजवरून केले होते. ही पोस्ट फेसबुकने न हटवल्याबद्दल त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
जेकब ब्लेक या कृष्णवर्षीय अमेरिकन व्यक्तीला अमेरिकेतील केनोशा, विस्कॉन्सिन शहरात पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले होते. यानंतर केनोशा येथे हिंसक निदर्शने सुरू झाली. यादरम्यान, फेसबुकवर अॅक्टिव्ह असलेल्या 'केनेशा गार्ड'कडून त्यांच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. याच्याद्वारे नागरिकांनी शस्त्रांसह केनोशात प्रवेश करावा, असे आवाहन केले होते. या भडकाऊ पोस्टनंतर अनेकांकडून फेसबुकला ही पोस्ट हटवण्याबद्दल कळवण्यात आले. मात्र, फेसबुकने त्याची दखल घेतली नाही. यासाठी सध्या फेसबुकवर टीका करण्यात येत आहे.