न्यूयॉर्क -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू आहे. कोरोनासंदर्भातील अँटीबॉडीजवरही काम सुरू आहे. अशातच आता एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली आहे. एका बाळाने थेट कोरोना विषाणू अँटीबॉडीजसहच जन्म घेतला आहे.
अमेरिकेत नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या शरीरात कोरोना विषाणुंविरूध्दच्या रोगप्रतिकारक पेशी (अँटीबॉडिज) सापडल्या असल्याचा दावा अमेरिकेतील बालरोग तज्ज्ञांनी केला आहे. अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. मुलीच्या आईला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यामुले मुलीमध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडी तयार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.
38 आठवड्यांची गर्भवती असताना संबंधित महिलेला मॉडर्ना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. लसीचा पहिला डोस घेतल्याच्या तीन आठवड्यांनंतर, महिलेने मुलीला जन्म दिला. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. मुलीची चाचणी केल्यानंतर तीच्या रक्तामध्ये अँटीबॉडिज आढळल्या आहेत.