महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

या काळातही लहान मुलांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रयत्न करा - जागतिक आरोग्य संघटना - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती

एखाद्या वेळेस लसीकरणाची मोहीम कोविड-19 चा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यामुळे थांबवण्याची वेळ आली तर, आम्ही संबंधित देशाच्या नेतृत्वांना लसीकरण न झालेल्या लहान मुलांचा शोध घेण्याचे आवाहन करत आहोत. या मुलांचा वेगाने शोध घेऊन त्यांच्यापर्यंत लसीकरण पोहोचवण्यात यावे किंवा जितक्या लवकर लसीकरण करणे शक्य होईल तेवढे करावे. यासह शक्य असेल ते सर्व प्रयत्न करावेत, असे जगभरातील आरोग्य संघटनांनी म्हटले आहे.

लहान मुलांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण
लहान मुलांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण

By

Published : Apr 15, 2020, 2:38 PM IST

न्यूयॉर्क -कोरोना विषाणूच्या जगभर होत असलेल्या फैलावाची भीती एका बाजूला असतानाच, दुसऱ्या बाजूला जगभरातील तब्बल 117 दशलक्ष लहान मुले गोवरसारख्या प्रतिबंधात्मक आजारांच्या लसींना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगभरात सर्वच देशांचे लक्ष कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी एकवटले आहे. यादरम्यान इतर आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होऊ नये, याकडे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने लक्ष वेधले आहे.

गोवर अ‌ॅण्ड रूबेला इनिशिएटिव्ह, अमेरिकन रेड क्रॉस, युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेसह इतर काही आरोग्य संघटनांकडून एकत्रित निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये गोवरसारख्या प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणाऱ्या लसीची प्रचार मोहीम 24 देशांमध्ये लांबणीवर पडली आहे. यातील बहुतेक देशांमध्ये ही मोहीम आणखी पुढे ढकलली जाईल, अशी शक्यता दिसत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या स्थितीत या सर्व संघटनांनी सर्व देशांनी त्या-त्या देशांमध्ये नेहमी चालणाऱ्या विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक वैद्यकीय सेवा तसेच सामाजिक आरोग्य सुविधा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा आदी सेवा सुरू ठेवण्यावर जोर दिला आहे.

या निवेदनात काही शिफारशी केल्या आहेत. 'एका बाजूला कोविड-19 चा धोका अनपेक्षितरित्या वाढत चालला असताना काही लसीकरणाच्या मोहिमा पुढे ढकलण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तरीही सर्व सरकारांनी अशा प्रकारच्या गंभीर आजारांवरच्या लसीकरणाच्या मोहीम पुढे ढकलण्याआधी धोका आणि इतर बाबींचे विश्लेषण करूनच निर्णय घ्यावेत,' अशी अत्यंत महत्त्वाची शिफारस केली आहे.

'एखाद्या वेळेस लसीकरणाची मोहीम कोविड-19 चा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यामुळे थांबवण्याची वेळ आली तर, आम्ही संबंधित देशाच्या नेतृत्वांना लसीकरण न झालेल्या लहान मुलांचा शोध घेण्याचे आवाहन करत आहोत. या मुलांचा वेगाने शोध घेऊन त्यांच्यापर्यंत लसीकरण पोहोचवण्यात यावे किंवा जितक्या लवकर लसीकरण करणे शक्य होईल तेवढे करावे. यासह शक्य असेल ते सर्व प्रयत्न करावेत,' असे या शिफारशींमध्ये पुढे म्हटले आहे.

संपूर्ण जगभरातील आरोग्य सेवांवर सध्या कोरोना विषाणूच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रसारामुळे ताण पडत आहे. यामुळे त्यांना त्यांच्या नियमित प्रतिबंधात्मक लसीकरणासारख्या सेवा पुरवणे कठीण होत आहे. यामध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीकरणाचाही समावेश आहे. या लसीकरणामुळे बालमृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात टाळले जाते. या प्रतिबंधात्मक लसी त्या लहान मुलांना न मिळाल्यास त्यांना जिवावरचा धोका उद्भवू शकतो, असे या निवेदनात म्हटले केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details