तेहरान - इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांनी अमेरिकेने लादलेल्या अमानुष निर्बंधांबद्दल टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेहरानविरोधात कुरघोड्या करण्यामागे व्हाईट हाऊसच जबाबदार आहे. शनिवारी कोरोनाबाबत देशातील आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय मुख्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर रूहानी माध्यमांशी बोलत होते.
अमेरिकेने बेकायदेशीर आणि अमानुषपणे, दहशतवादी कारवायांद्वारे आमच्या देशात औषध आणि अन्नाचा होणारा पुरवठा थांबवला. व्हाईट हाऊसमध्ये अशा बर्बरपणाचे लोक आम्ही कधी पाहिले नाहीत. ते खूपच अत्याचारी आहेत. इराणला कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) 5 अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळणार होते, यातही त्यांनी आडकाठी घातल्यावरून अध्यक्ष रूहानी यांनी अमेरिकेचा निषेध नोंदवला.