वॉशिंग्टन - पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिका सौदी अरेबियावर आवश्यक दबाव टाकत नाही, असा आरोप 'वॉशिंग्टन पोस्ट' या दैनिकाने केला आहे.
अमेरिका प्रशासन सौदीवर याप्रकरणी आवश्यक दबाव आणत नाही, असे आम्हाला वाटत आहे. 'माध्यम स्वातंत्र्य' या विषयावर आयोजित चर्चेदरम्यान 'वॉशिंग्टन पोस्ट'चे संपादक मार्टिन बॅरन बोलत होते. इस्तांबुलमध्ये सौदी अरबच्या वाणिज्य दुतावासात २ ऑक्टोबर २०१८ रोजी जमाल यांची हत्या करण्यात आली होती.
माध्यम स्वातंत्र्य आणि शोध पत्रकारितेशिवाय खशोग्गींच्या हत्येमागील सत्य बाहेर येणार नाही, असेही बॅरन यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खशोग्गींच्या हत्येमागे सौदीचे राजे मोहंमद बिन सलमान यांचा हात असल्याचे नाकारले आहे.
खशोग्गी हे पत्रकार होते. इस्तांबुल येथील वाणिज्य दुतावासात खशोग्गींची हत्या करण्यात आली होती. खशोग्गींचा जन्म १३ ऑक्टोबर १९५८ साली सौदीतील धार्मिक शहर मदिना येथे झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सौदीमध्ये झाले होते. त्यांनी १९८३ मध्ये अमेरिकेच्या इंडियाना विश्वविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते पत्रकारितेमध्ये आले. खशोग्गी हे डोडी फयाद यांचे चुलत भाऊ होते. फयाद प्रिंसेस डायनाचे प्रियकर होते. फयाद यांचा पॅरिसमधील एका कार अपघातात डायनासह मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानमधील सोव्हिएत संघाची सेना आणि मुजाहिद्दीन यांच्यातील संघर्षाचे वार्तांकन करताना खशोग्गी पहिल्यांदा चर्चेत आले. २००३ साली खशोग्गी यांना सौदी अरबच्या सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या 'अल-वतन' या दैनिकाचे संपादक म्हणून नियुक्त केले गेले. मात्र, आपल्या क्रांतीकारी विचारांमुळे ते या पदावर टिकू शकले नाहीत.