वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एका दिवसामध्ये कोरोनामुळे सुमारे दीड हजार जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे. कोरानामुळे एका दिवसात ऐवढे मृत्यू होणाऱ्यांची जगातील ही पहिलीच घटना आहे.
गुरूवारी सायंकाळी ८.३० ते शुक्रवारी रात्री ८.३० पर्यंत अमेरिकेमध्ये १,४८० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने या मृत्यूंची नोंद ठेवली आहे. यानंतर अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ७,४०६वर पोहोचली आहे.
दरम्यान, शुक्रावारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यानुसार अमेरिकी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, हे सांगतानाच आपण मात्र असे करणार नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
यासोबतच देशाच्या रोग प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्रानेही नागरिकांसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. यात त्यांनी नागरिकांना - विशेषतः त्या भागातील जिथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत - सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा झाकण्यास सांगितले आहे. वैद्यकीय मास्क न मिळाल्यास टी-शर्ट, रुमाल, स्कार्फ इ. गोष्टींनीदेखील आपण चेहरा झाकू शकता असे त्यांनी लोकांना सांगितले आहे.
हेही वाचा :इंग्लंडच्या पंतप्रधानांना अजूनही कोरोनाची लक्षणे