वॉशिंग्टन -अमेरिकेने पाकिस्तानला विक्री केलेल्या F-16 लढाऊ विमानांचा पाकिस्तानने गैरवापर केल्याची अमेरिकेची खात्री पटली आहे. यावरून अमेरिकेने पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले आहे.
अमेरिकेच्या तत्कालीन लष्करी सामुग्रीवर नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसंबंधी व्यवहार सांभाळणाऱ्या दुय्यम सचिव अँड्रिया थॉम्पसन यांनी पाकिस्तानचे एअर चीफ मार्शल मौजाहिद अन्वर खान यांना F-16 लढाऊ विमानांच्या वापराविषयी पत्र लिहिले होते. भारताने पाकिस्तानचे F-16 विमान पाडल्याचा दावा फेब्रुवारी २-१९ मध्ये केला होता. या बाबीचा पत्रात उल्लेख नाही. मात्र, पाकिस्तानने ही विमाने खरेदी करताना मान्य केलेल्या करारातील अटींचा भंग केल्याचे या पत्रात म्हटले आहे.
२७ ऑक्टोबरला भारताने पाकिस्तानातूल बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील भारताच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानने टाकलेल्या बॉम्बमुळे खड्डे पडल्याचा अहवाल भारताने सादर केला होता. तसेच, पाकिस्तानचे विमान पाकिस्तानच्या सीमेच्या बाहेर आणि भारताच्या सीमेच्या आत तीन किलोमीटर पाडल्याचा दावा भारताने केला होता. तसेच, हे विमान 'लाम' या परिसरात कोसळताना याचा पायलट पॅराशूटसह बाहेर पडल्याचेही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटले होते. मात्र, त्याविषयी अधिक माहिती मिळाली नाही.
सध्या थॉम्पसन या सरकारमध्ये नाहीत. मात्र, त्यांनी पाकिस्तानच्या वर्तणुकीबद्दल इशारा दिला आहे. तसेच, पाकिस्तानकडे असलेली शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोकाही व्यक्त केला आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला F-16 श्रेणीतील ७६ लढाऊ विमानांचा ताफा दिला आहे. यातील पहिले विमान पाकने १९८२ मध्ये खरेदी केले होते. या लढाऊ विमानांसोबत त्यांच्यासह येणारी क्षेपणास्त्रेही पाकिस्तानातील मुशफ आणि शाहबाज या लष्करी तळांवर आहेत. या सर्व शस्त्रास्त्रांचा वापर दहशतवादाशी लढण्यासाठी करणे पाकिस्तानसाठी बंधनकारक आहे. खरेदी व्यवहारातील अटींनुसार, या विमानांचा वापर पाकिस्तानला कोणत्याही परदेशावर हल्ला करण्यासाठी करता येणार नाही.