वॉशिंग्टन -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भारत दौऱयावर प्रतिक्रिया दिली आहे. मी भारतात जाण्यास उत्सुक असून मोदी हे एक सज्जन व्यक्ती आहेत, असे ट्र्म्प म्हणाले.
'मी भारत दौऱयावर जाणार आहे. तिथे माझे स्वागत करण्यासाठी विमानतळापासून ते स्टेडियमपर्यंत लाखो लोक उपस्थित राहतील, असे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगतिले. मोदी एक सज्जन व्यक्ती असून ते माझे खुप चांगले मित्र आहेत. मी भारतात जाण्यासाठी उत्सुक आहे', असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प भारतभेटीवर येत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया देखील येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथग्रहण केल्यानंतर तीन वर्षांनी, अखेरीस डोनाल्ड ट्रम्प आता भारताला भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या ८ वर्षांच्या अध्यक्षीय कार्यकालात २०१० आणि २०१५ असे दोन वेळा भारताला भेट दिली होती.
ट्रम्प यांची भारतभेट जगाच्या नजरेत भरण्याच्या दृष्टीने आणि राजकीय रेट्यासाठी महत्वाची ठरणार आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. यापूर्वी २०१९ या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन समारंभास ट्रम्प यांना भारताने प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले होते, पण व्हाईट हाऊसने नंतर हे निमंत्रण अध्यक्षांच्या राष्ट्राला उद्देश्यून करावयाच्या भाषणाची तारीख एकच येत असल्याचे कारण सांगत नाकारले होते.