नवी दिल्ली - अमेरिकेने पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाचा कालावधी ५ वर्षांवरून कमी करून फक्त ३ महिन्यांवर आणला आहे. अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. पुलवामा येथे भारतीय सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून टीका होत आहे. तसेच, जागतिक पातळीवर पाकिस्तान एकाकी पडत चालला आहे.
डोनाल्ड ट्रंप सरकारने हा निर्णय घेतला आहे. याआधी पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेचा ५ वर्षांपर्यंतचा व्हिसा दिला जात होता. याआधी अमेरिकेने दहशतवादाला पाकिस्तानच्या भूमीवर थारा न देण्याबद्दल पाकला बजावले होते. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या भूमीवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई सर्जिकल स्ट्राइकलाही अमेरिकेने पाठिंबा दिला होता. तसेच, ही कारवाई योग्यच असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे भारतीय सीआरपीएफ जवानांच्या बसेसच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला होता. यात ४० जवानांना प्राणांना मुकावे लागले होते. यानंतर पाकिस्तानला जगभरातून टीकेचा आणि आर्थिक तसेच, राजकीय कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता पाकिस्तानी नागरिकांना केवळ ३ महिन्यांचा अमेरिकन व्हिसा मिळणार आहे. भारताने जागतिक पातळीरून पाकिस्तानवर दबाब आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आता अमेरिकेकडून पाकिस्तानवर करण्यात येत असलेली कारवाई हे भारताचे यश म्हणावे लागेल.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काय केले?
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने लष्कराला खुली सूट दिली. तसेच, पाकिस्तानचा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला होता. यानंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या शोधमोहिमेत जैशचे अनेक दहशतवादी ठार झाले. २६ फेब्रुवारीच्या पहाटे हवाई दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या कारवाईला जगभरातून समर्थन मिळाले.