महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिका अध्यक्षीय निवडणूक : मतदान पूर्ण, आता लक्ष निकालाकडे..

US Elections 2020: Voting begins, first ballots cast in New Hampshire
अमेरिका अध्यक्षीय निवडणूक LIVE : न्यू हॅम्पशायरमधून मतदानाला सुरुवात

By

Published : Nov 3, 2020, 3:28 PM IST

Updated : Nov 4, 2020, 7:11 AM IST

07:10 November 04

अमेरिकेतील मतदान पूर्ण, आता लक्ष निकालाकडे..

अमेरिकेत ४५व्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. काही राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया अजूनही सुरू असणार आहे. मात्र, ज्या राज्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे तेथील निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या दोघांनाही विजयासाठी २७० इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे.

01:48 November 04

पुन्हा एकदा विश्वास दाखवा - बायडेन

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान सुरू आहे.  पुढील राष्ट्राध्यक्ष कोण होणार ? याचा फैसला अमेरिकेतील जनता आज करणार आहे. मतपेटीत दोन्ही नेत्यांचे भविष्य बंदीस्त होत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवा, असे आवाहन डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी केले आहे. देशाची विस्कटलेली घडी मी पुन्हा एकदा नीट बसवेल. तुम्हाला मी खाली पाहायला लावणार नाही, असे भावनिक आवाहन बायडेन यांनी मतदारांना केले आहे.  

01:28 November 04

माजी राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन आणि पत्नी हिलरी क्लिंटन यांनी बजावला मतदानाचा हक्क

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन आणि पत्नी हिलरी क्लिंटन यांनी मतदानाचा हक्क बजावला. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना मतदान केल्याचा अभिमान आहे. ते दोघे अमेरिकेत माजलेली दुफळी कमी करुन चांगले भविष्य निर्माण करतील, असा विश्वास असल्याचा संदेश त्यांनी ट्विटरवरून दिला. नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही क्लिंटन यांनी केले.  

22:39 November 03

फ्लोरिडाच्या पाम बीच येथे 'फर्स्ट लेडी' मेलेनिया ट्रम्प यांनी केले मतदान

फ्लोरिडाच्या पाम बीच येथे 'फर्स्ट लेडी' मेलेनिया ट्रम्प यांनी मतदानाचा हक्क बजावला.

22:36 November 03

स्क्रॅन्टनमधील शेवटच्या टप्प्यात बायडेन यांनी मानले मतदारांचे आभार

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी त्यांच्या मूळ गावी स्क्रॅन्टन येथे जाऊन मतदारांचे आभार मानले. बायडेन आता फिलाडेल्फियाला जाणार आहेत.

22:33 November 03

होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या 'सायबर-सिक्युरिटी सेल'च्या निरीक्षणाखाली निवडणूक प्रक्रिया

होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या सायबर-सिक्युरिटी सेलद्वारे वॉशिंग्टन डी.सी.च्या बाहेर सर्व निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येत आहे. ऑपरेशन सेंटरमध्ये देशभरात पार पडणाऱ्या मतदानाबद्दल तसेच निवडणुकांमध्ये कोणत्याही संभाव्य धोक्यांवर फेडरल अधिकारी नजर ठेऊन आहेत.

22:28 November 03

ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन यांच्या निवडणूक मोहिमेवर अमेरिकन समाधानी - मतदार

ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन यांच्या निवडणूक मोहिमेवर अमेरिकन समाधानी असल्याचे सर्व्हेक्षणात समोर आले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी राबवलेल्या निवडणूक मोहिमेवर अमेरिकन नागरिक समाधानी असल्याचे पोल्स समोर आले आहेत.

20:57 November 03

आपण 'या' संकटातून बाहेर येऊ शकतो - बायडेन यांचे ट्विट

आपण या संकटावर विजय मिळवू शकतो. आपण आपला देश परत आणू शकतो. आपण राष्ट्राच्या आत्म्यासाठी लढाई जिंकू शकतो, अशा शब्दात जो बायडेन यांनी भावना व्यक्त करत सर्वांना मतदानाचे आवाहन केले आहे.

20:26 November 03

जो बायडेन हे पेन्सलव्हेनियात... जन्मगावी घेतली मतदारांची भेट!

डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन हे पेन्सलव्हेनियात पोहोचले आहेत. या ठिकाणी त्यांनी मतदारांची भेट घेतली. तसेच बायडेन सध्या त्यांच्या गावी म्हणजेच स्क्रॅन्टन, फिलाडेल्फियात आहेत.

19:30 November 03

ह्यूस्टनमध्ये मतदानाला सुरुवात..

'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचे ज्या शहरात आयोजन करण्यात आले होते, त्या ह्यूस्टनमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. याठिकाणचे लोक मोदींचे मित्र असलेल्या ट्रम्पना मत देतात, की भारतीय वंशाच्या कमला हॅरिसला पसंती दर्शवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

19:09 November 03

मुलाच्या थडग्याला भेट देत निवडणुकीच्या दिवसाची सुरुवात..

जो बायडेन यांनी आपल्या मुलाच्या थडग्याला भेट देत निवडणुकीच्या दिवसाची सुरुवात केली आहे. यावेळी त्यांच्या पत्नी जिलदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. २०१५मध्ये त्यांच्या मुलाचा मेंदूच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. तो इराकमध्ये अमेरिकी सैन्यातही होता, ज्याबद्दल बायडेन वेळोवेळी अभिमानाने सांगतात.

19:05 November 03

ही राज्ये ठरणार महत्त्वाची..

डिक्सव्हिले नॉच आणि मिल्सफील्डमध्ये पार पडले मतदान

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत फ्लोरिडा, जॉर्जिया, न्यू हेम्पशायर, ओहियो आणि मिशिगन ही राज्ये महत्त्वाची ठरणार आहेत.

19:04 November 03

मिशिगन, फ्लोरिडामध्ये मतदानास सुरूवात

अमेरिकेतील मिशिगन आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे.

17:24 November 03

न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि व्हर्जिनियामध्ये मतदानास सुरुवात..

न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये मंगळवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) मतदानास सुरुवात झाली आहे. 

16:55 November 03

आशियाई अमेरिकन रिपब्लिकन ग्रुपचा बायडेनना पाठिंबा

आशियाई अमेरिकी रिपब्लिकन ग्रुपने आपल्या हजारो सदस्यांना बायडेन यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. २०१६मध्ये या ग्रुपने ट्रम्पना पाठिंबा दिला होता. मात्र, यावेळी त्यांनी ट्रम्पऐवजी बायडेन यांना पसंती दर्शवली आहे.

"जरी तुम्ही २०१६ मध्ये ट्रम्प यांना मतदान केले असेल, किंवा जरी तुम्हाला बायडेन यांची काही मते पटत नसतील; तरीही अमेरिकेच्या भविष्यासाठी आणि आपल्या कुटुंबीयांच्या भवितव्यासाठी तुम्ही बायडेन यांना मतदान करा. संपूर्ण जगाचे भवितव्य या निवडणुकीवर टिकून आहे. त्यामुळे जगाला आणि अमेरिकेला वाचवण्यासाठी बायडेन यांना मत द्या", असे या ग्रुपने आपल्या आवाहनामध्ये म्हटले आहे.

16:19 November 03

व्हर्मोंटमधील मतदान केंद्रे उघडली..

अमेरिकेतील स्टेट ऑफ व्हर्मोंटमधील मतदान केंद्रे मंगळवारी पहाटे पाच वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू झाली. यानंतर येथील मतदान प्रक्रियेस सुरू झाली आहे. या राज्याने १९९२ पासून डेमोक्रॅट पक्षाला बहुमत दिले आहे. २०१६ मध्ये डेमोक्रॅटच्या उमेदवार हिलरी क्लिंटन या ५६.६८ टक्के मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ३०.२७ टक्के मतं मिळाली होती.

15:59 November 03

हार्ट्स लोकेशनमध्ये होणार नाही मध्यरात्रीचे मतदान

डिक्सव्हिले नॉच आणि मिल्सफील्ड सोबतच, हार्ट्स लोकेशन याठिकाणीदेखील मध्यरात्री मतदान पार पडते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या परंपरेला खंड दिला गेला आहे. मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान करण्याचा निर्णय येथील स्थानिकांनी घेतला आहे.

15:56 November 03

६० वर्षांची परंपरा खंडीत..

डिक्सव्हिले नॉच आणि मिल्सफील्डमध्ये अमेरिकेतील पहिले मत टाकले जाते. १९६० पासून ही परंपरा सुरू आहे. दरवर्षी याठिकाणी हा पहिल्या मताचा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला स्थगिती देण्यात आली आहे. यंदाचे हे साठावे वर्ष असूनही याचा मोठा सोहळा करता येत नसल्याचे दुःख येथील स्थानिकांनी व्यक्त केले.

15:44 November 03

डिक्सव्हिले नॉच आणि मिल्सफील्डमध्ये पार पडले मतदान

डिक्सव्हिले नॉच आणि मिल्सफील्डमध्ये पार पडले मतदान

न्यू हॅम्पशायरच्या डिक्सव्हिले नॉच आणि मिल्सफील्ड भागामध्ये मतदान पार पडले. डिक्सव्हिले नॉच अमेरिकेतील सर्वात छोटा प्रदेश आहे. या भागात केवळ पाच मतदार आहेत. या पाचपैकी एकाने यापूर्वीच पोस्टल बॅलेटचा वापर करुन आपले मत नोंदवले होते. याठिकाणची सर्व मते जो बायडेन यांना मिळाली आहेत. तर दुसरीकडे, मिल्सफील्डमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना १६ मते मिळाली आहेत.

15:24 November 03

अमेरिका निवडणूक : मतदानाला सुरुवात..

वॉशिंग्टन : अमेरिकेत ४५व्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. देशाच्या न्यू हॅम्पशायर शहरात यासाठी पहिले मत टाकले गेले. देशातील सुमारे दहा कोटी लोकांनी यापूर्वीच पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून आपले मत नोंदवले आहे. जे मतदार स्वतः मतदान केंद्रावर जाऊन मत देऊ इच्छितात, त्यांना आज मतदान करता येणार आहे.

रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. तर, डेमोक्रॅटिक पक्षातर्फे दोन वेळा अमेरिकेचे उपाध्यक्ष राहिलेले जो बायडेन निवडणूक लढवत आहेत.

या निवडणुकीसाठी देशात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच, व्हाईट हाऊसच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हिंसाचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये विशेष सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Last Updated : Nov 4, 2020, 7:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details