वॉशिंग्टन डी.सी -कोरोना महामारीमुळे सध्या चीन आणि अमेरिकादरम्यान तणाव आहे. यातच वांशिक अल्पसंख्यांकांवरील चिनच्या क्रूर कारवाईवर कडक भूमिका घेण्यासाठी बुधवारी अमेरिकेच्या संसदेत द्विपक्षीय विधेयक मंजूर करण्यात आले आहे. संसदेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही सदस्यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले. यामध्ये मुस्लिमांना ताब्यात ठेवल्यावरून आणि निगराणी केल्याप्रकरणी चीनच्या अधिकाऱ्यांना व्हिसा प्रतिबंधित केला जाणार आहे.
हे विधेयक कायद्यात रुपांतर करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता आहे. या विधेयकाचा अतिशय गांभीर्याने विचार करू, असे डोनाल्ड ट्रम्प गेल्या आठवड्यात म्हणाले होते. दरम्यान कोरोना आणि हाँगकाँगमधील नागरी हक्कांवर बंदी घालण्याच्या चीनी योजनेमुळे अमेरिका आणि चीन यांच्यात आधीच तणाव आहे. या विधेयकामुळे हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.