वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेने अखेर जो बायडेन यांच्या निवडणूक विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. पेन्सिल्व्हेनिया आणि अॅरिझोनामधील मतमोजणीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते, हे सर्व आरोप अमेरिकी संसदेने फेटाळून लावले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बुधवारी बोलविण्यात आले होते. मात्र, यावेळी ट्रम्प समर्थकांनी संसदेबाहेर (यूएस कॅपिटॉल हील) राडा घातला. संसदेत घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून रोखले. त्यानंतर अधिवेशनाचे कामकाज पूर्ण करत, संसदेने बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बायडेन यांना विजयासाठी २७० इलेक्टोरल व्होट्सची गरज होती, तर त्यांना ३०६ इलेक्टोरल व्होट्स मिळाल्याचे संसदेने स्पष्ट केले.
योग्य पद्धतीने होईल सत्तेचे हस्तांतरण..
संसदेच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, की अमेरिकेच्या संसदेचा हा निर्णय मला मान्य नसला तरीही २० जानेवारीला सत्तेचे अगदी व्यवस्थितरित्या हस्तांतरण होईल. ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंड बंद करण्यात आल्यामुळे, त्यांचे प्रवक्ते डॅन स्कॅव्हिनो यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद..
फेसबुक, इस्टाग्राम आणि ट्विटरने नियमांचे उल्लंघन केल्याच ठपका ठेवत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट काही काळासाठी बंद केले आहे. २४ तासांसाठी ट्रम्प यांचे इस्टाग्राम खाते बंद करत असल्याची घोषणा इस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मॉझेरी यांनी केले आहे. फेसबुकने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रम्प यांचे व्हिडिओ काढून टाकले आहेत. तर ट्विटरनेही ट्रम्प यांच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.
हेही वाचा :US Capitol clash: अमेरिकेच्या संसदेबाहेर ट्रम्प समर्थकांचा राडा