वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी धुडगूस घातल्यानंतर अनेक उच्चपदस्थांनी राजीनामा दिला आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रमुखांनी राजीनामाही आज राजीनामा दिला. युएस कॅपिटॉल पोलीस चिफ स्टिवन सुंद यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. आंदोलकांना रोखण्यात अपयश आल्याची टीका त्यांच्यावर होत होती, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
ट्रम्प यांनी मान्य केला पराभव -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव मान्य केला आहे. पुढील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असतील अशी घोषणा त्यांनी अधिकृतरित्या केली आहे. काल (गुरुवार) डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेच्या कॅपिटॉल हिल इमारतीत धुडगूस घातल्यानंतर या घटनेचे जगभरात प्रतिसाद उमटले. हा अमेरिकेच्या लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप डेमोक्रटिक पक्षाने केला.