माद्रिद (स्पेन) - स्पेनमधील माद्रिद येथे २ ते १५ डिसेंबर या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान परिषद सुरू आहे. या परिषदेमध्ये २०० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी यावेळी बोलताना हवामान बदलाविषयी सुरू असलेली लढाई कुणीही सोडू नका, असे कळकळीचे आवाहन केले.
जागतिक तापमान वाढवणाऱ्या हवामानातील वायूंचा स्तर अतिउच्च पातळीवर पोहोचला आहे. ३० लाख वर्षांपूर्वी नव्हता इतका हा स्तर वाढला आहे. आजच्या तुलनेत त्यावेळी समुद्राचा स्तरही १० ते २० मीटर उंच होता, असे गुतारेस यांनी उद्घाटनीय भाषणामध्ये हवामानाविषयीच्या भीषण आकडेवारीचा दाखला देत सांगितले.
हेही वाचा -पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू
कार्बनडाय ऑक्साईड आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत, तर याचा संपूर्ण जगाला मोठा धोका आहे. कोळसा जाळणे जोपर्यंत आपण बंद करणार नाही, तोपर्यंत हवामान बदलाविषयी सुरू असलेले सर्व प्रयत्न हे निरर्थक ठरतील, असा इशारा त्यांनी दिला.
हवामान बदलांविषयी काम करण्यास आपण १० वर्षांपूर्वीच सुरू केले असते, तर हे उत्सर्जन ३.३ टक्के या प्रमाणात कमी करणे ध्येय ठेवता आले असते. मात्र, आता वेळ पुढे गेली असून प्रत्येक राष्ट्राला हे प्रमाण आता ७.६ टक्के इतके कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यावर सर्व देशांचे सरकार, क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे असून हा एकमेव मार्ग आहे, असे गुतारेस म्हणाले.