नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियन आणि युनिसेफच्या अहवालानुसार जगभरातील 3 ते 17 वर्षे वयोगटातील सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थ्यांच्या घरी इंटरनेट कनेक्शन नसल्याचे समोर आले आहे. यावरुन सुमारे 1 अब्ज 30 कोटी मुले-तरुणांना कौशल्य विकास तसेच शिक्षण घेण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियन आणि युनिसेफने दिलेल्या अहवालानुसार 15 ते 24 वर्षे वयोगटातील मुलांना, अशाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. जगभरातील 75 कोटी 90 लाख किंवा 63 टक्के घरांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही.
ही तर डिजिटल दरी
युनिसेफचे कार्यकारी संचालक हॅन्रिएटा फोर यांच्या म्हणण्यानुसार इंटरनेट उपलब्ध नसलेल्यांची इतकी मोठी संख्या म्हणजे जगात डिजिटल दरी निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांना भविष्यात सोसावे लागणार मोठे नुकसान
हॅन्रिएटा फोर म्हणाले, इंटरनेटची सुविधा नसणे म्हणजे लहान मुले व तरुणांमध्ये केवळ तंत्रज्ञानापासून दूर ठेवत नाही तर ते आधुनिक जगापासून दूर फेकले जातात. त्याचबरोबर ते जागतिक आधुनिक अर्थव्यवस्थेपासून दूर होत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणास मोठी चालना मिळाली आहे. मात्र, अनेकांकडे इंटरनेट नसल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. याचा परिणाम त्यांना भविष्यात सोसावे लागणार आहे.
शिक्षण म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसाठी दिवा स्वप्नच
युनिसेफच्या अहवालानुसार, कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे सुमारे 25 कोटी विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आपले शिक्षण सुरू ठेवण्यासाठी विविध उपकरण व इंटरनेटवर अवलंबून रहावे लागत आहे. पण, ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही त्यांच्यासाठी शिक्षण मात्र एक दिवा स्वप्नच आहे.