वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील कोरोनाची लागण झालेले हे सर्वोच्च पदस्थ व्यक्ती आहेत.
दोन अधिकाऱ्यांनी आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर याबाबतची माहिती दिली आहे. तर, ओब्रायन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्याचे व्हाईट हाऊसने सांगितले आहे. त्यामुळे ओब्रायन हे स्व-विलगीकरणात गेले असून, त्यांचा राष्ट्राध्यक्ष किंवा उपराष्ट्राध्यक्ष यांच्याशी संपर्क आलेला नसल्याची माहितीही व्हाईट हाऊसने दिली.
याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ब्लूमबर्ग या वाहिनीने प्रसिद्ध केले होते. ओब्रायन यांनी एका घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याचे या वृत्तवाहिनीने सांगितले.
यापूर्वी राष्ट्राध्यक्षांच्या एका खासगी वॅलेटला, तसेच उपराष्ट्राध्यक्षांच्या पत्रकार सचिवालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. अमेरिकेत कोरोनाचे चाळीस लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची दररोज कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
हेही वाचा :हेरगिरी करत असल्याचा आरोप करत चीनला एस-४०० मिसाईल देण्यास रशियाचा नकार..