वाॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल सध्या जाहीर होत असून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकले आहे. जो बायडेन यांना 238 इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांना 213 इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फ्लोरिडा, टेक्सासमध्ये बाजी मारली आहे. तर आणखी पाच ठिकाणावर ते आघाडीवर आहेत.
ट्रम्प पुन्हा इतिहास घडवणार का...
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये फ्लोरिडाला महत्त्वाचे स्थान आहे. कारण, फ्लोरिडामध्ये एकूण 29 इलेक्टोरल व्होट्स आहेत. जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प दोघांनी फ्लोरिडामधल्या प्रचारावर विशेष भर दिला होता. ज्या उमेदवाराने फ्लोरिडामध्ये विजय मिळवलाय, त्याने पुढे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचा इतिहास आहे. टेक्सासमध्ये 38, ओहियोत 18, तर नॉर्थ कैरोलिनामध्ये 15, जॉर्जिया 16 आणि आयोवामध्ये 6 इलेक्टोरल व्होट्स आहेत. त्यामुळे येथील विजय निर्णायक ठरतो.
ट्रम्प यांना विजयाचा विश्वास
डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी सुरू असताना पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षावर केला. तसेच या घोटाळ्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तथापि, विजयासाठी 270 इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे.