वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अध्यक्षीय वादविवादामध्ये भारताला ओढले आहे. यावेळी हवेतील कार्बन उत्सर्जनाबाबत बोलताना त्यांनी भारतामधील हवा घाणेरडी आहे अशा आशयाचे वक्तव्य केले.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यादरम्यानची तिसरी आणि शेवटची अध्यक्षीय डिबेट (वादविवाद) टेनिसीमध्ये आज पार पडली. निवडणुकीला अवघे १२ दिवस राहिले असताना होत असलेल्या या वादविवादाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. एनबीसीच्या क्रिस्टन वेल्कर यांनी या वादविवादाचे समालोचन केले.
यावेळी क्रिस्टन यांनी पर्यावरणासंबंधी विचारणा केली असता, हवेतील कार्बन उत्सर्जनाबाबत आपण ठोस पावले उचलली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. "इतर देशांच्या तुलनेत आपण नक्कीच चांगले काम करत आहोत. तुम्ही भारत, चीन किंवा रशियामध्ये जाऊन पहा की तेथील हवा किती घाणेरडी आहे." अशा आशयाचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. तसेच, गेल्या ३५ वर्षांमध्ये अमेरिकेत सर्वात कमी कार्बन उत्सर्जन झाल्याचा दावाही त्यांनी केला.