वॉशिंग्टन :निर्धारित वेळेनंतर आलेले एकही बॅलेट मतमोजणीसाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी मागणी ट्रम्प यांनी बुधवारी केली होती. तसेच, मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारीही त्यांनी यावेळी दाखवली होती. त्यानंतर आज ट्रम्प यांच्या कॅम्पेनने तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अनेक नागरिक पोस्ट, मेल या पर्यायाद्वारे मत नोंदवत आहेत. मात्र, सध्या सुरु असलेले सर्व मतदान थांबवले जायला हवे. निर्धारीत वेळेनंतर आलेले एकही बॅलोट मतमोजणीसाठी ग्राह्य धरले जाऊ नये, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ असे डोनाल्ड ट्र्म्प बुधवारी म्हणाले होते. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास, मी जिंकलोच आहे असेही ते म्हणाले होते.
ट्रम्प यांनी तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले..
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पेनने बुधवारी पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन आणि जॉर्जिया या तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले आहेत. डेप्युटी कॅम्पेन मॅनेजर जस्टिन क्लार्क यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी पेन्सिल्व्हेनिया आणि नेव्हाडामधील मतदान मोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासंबंधीची याचिकाही दाखल केली आहे. तसेच, पेन्सिल्व्हेनियामध्ये मतदानाच्या दिवसानंतर तीन दिवसांपर्यंत आलेले बॅलोट मतमोजणीसाठी ग्राह्य धरण्यात यावे की नाही याबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही ट्रम्प कॅम्पेन करत असल्याचे क्लार्क यांनी सांगितले.