वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. टिक टॉक आणि वी-चॅट या ॲपवर बंदी घालण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी गुरुवारी स्वाक्षरी केली. या ॲप्सचा वापर बंद करण्यासाठी त्यांनी 45 दिवसांची मुदत दिली आहे.
टिक टॉक आणि वी-चॅट या ॲपची मालकी असणार्या कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. या ॲप्सचा वापर केल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे ही ट्रम्प यांनी सांगितले.
टिक टॉक आणि वी-चॅट ही ॲप अमेरिकन नागरिकांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला पोहोचवतात, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. या ॲपद्वारे चीनला अमेरिकन नागरिक तसेच कर्मचारी यांचे ठिकाण ट्रॅक करण्याची परवानगी मिळते. चिनी कम्युनिस्ट पार्टी या माहितीचा गैरवापर करू शकते, असाही आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
टिकटॉक हे व्हिडिओ शेअरिंग ॲप बाईटडान्स कंपनीच्या मालकीचे आहे. वी चॅट हे सोशल मीडिया मेसेजिंग ॲप टेनसेंट कंपनीच्या मालकीचे आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी यापूर्वी टिक टॉक अमेरिकन नागरिकांची माहिती गोळा करत असल्याचा आरोप केला होता.अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना टिकटॉक वापरण्यावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.
भारताने सुरक्षेच्या कारणावरून 106 चिनी ॲप बंदी घातली आहे. अमेरिकेने भारताच्या पावलावर पाऊल ठेवत टिक टॉक आणि वी चॅटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, टिकटॉककडून यापूर्वी अमेरिकेतील वापरकर्त्यांचा डाटा अमेरिकेतील सर्व्हरमध्ये जतन केला आहे. त्याचा बॅकअप सिंगापूरमधील सर्व्हरमध्ये जतन करण्यात आला आहे. त्यामुळे माहिती चीनला मिळण्याची शक्यता नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले होते.