वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई सुरू आहे. मात्र, ही कारवाई त्यांनी फेटाळून लावली आहे. ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. यास ट्रम्प यांना जबाबदार धरण्यात आले आहे. 'देशाविरोधात बंडाळी' असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून साक्ष देण्यास नकार दिला आहे.
सिनेट सभागृहाचे हजर राहण्याचे आदेश -
अमेरिकन संसदेतील सिनेट सभागृहाने ट्रम्प यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ट्रम्प यांनी सभागृहात साक्ष देण्यास नकार दिला आहे. माझ्या विरोधात सुरू असलेला खटला असंविधानिक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात एक मजबूत खटला उभा करण्यासाठी कंबर कसली आहे. जर ट्रम्प सिनेट सभागृहात साक्ष देण्यास हजर राहिले नाही तर त्यांच्यावरील आरोप सिद्ध होण्यास मदत होईल, असे म्हटले आहे. सिनेट सभागृहाने ट्रम्प यांना सभागृहात हजर राहण्यासाठी अधिकृत पत्र पाठवले आहे.