वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजधानी वॉशिंग्टन डी. सी मध्ये आणीबाणी घोषित केली आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी कार्यक्रम २० जानेवारीला होणार आहे. मात्र, ट्रम्प यांनी २४ जानेवारीपर्यंत आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. संसदेच्या कॅपिटॉल हिल इमारतीत हिंसाचाराची घटना घडल्यानंतर व्हाईट हाऊसने खबरदारी घेत आणीबाणी जाहीर केली आहे.
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी आधी अमेरिकेतील सर्वच्या सर्व म्हणजे ५० राज्यात सशस्त्र आंदोलन होणार असल्याचा इशार फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनने दिला आहे. अमेरिकेच्या संसदेवर म्हणजे कॅपिटॉल इमारतीवरही पुन्हा आंदोलन होणार असल्याचा इशार एफबीआयने वर्तवला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी आणीबाणी लागू केली आहे.
२० तारखेला शपथविधी मात्र, आणीबाणी २४ पर्यंत
जो बायडेन यांच्या शपथविधी २० जानेवारीला होणार आहे. मात्र, आता २४ पर्यंत स्टेट ऑफ कोलंबियात आणीबाणी असणार आहे. यामध्ये अमेरिकेच्या राजधानीचाही समावेश होतो. राज्याच्या सुरक्षा यंत्रणांना परिस्थिती हाताळण्यासाठी संघराज्य मदत करेल असे, अधिकृत वक्तव्य व्हाईट हाऊस कार्यालयाने जारी केली आहे. जो बायडेन यांच्या शपथविधी कार्यक्रमाला आता किती लोकांना येता येईल, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
सहा जानेवारीला संसदेच्या इमारतीत हिंसाचार -
६ जानेवारीला अमेरिकेच्या संसदेबाहेर ट्रम्प समर्थकांची रॅली आयोजित करण्यात आली होती. यास ट्रम्प यांचाही पाठिंबा होता. रॅली सुरू असताना जमाव हिंसक झाला. सुरक्षा कवच तोडून आंदोलकांनी संसदेच्या इमारतीत घुसून धुडगूस घातला. यावेळी झालेल्या हिंसाचारात चार जणांना मृत्यू झाला. तर पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. या घटनेचे संपूर्ण जगातून पडसाद उमटले. आता विरोधी पक्ष डेमोक्रॅट्सने ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू केली आहे. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यास फक्त ८ दिवस राहीले असतानाही त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.